Savitribai Phule Information In Marathi | सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

By vedu Jan 28, 2026
Savitribai Phule Information In Marathi

सावित्रीबाई जोतीराव फुले यांची प्राथमिक माहिती

भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४० मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला.

लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.

१८९७मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यातच १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंना ज्ञानज्योती, क्रांतिज्योती या टोपण नावाने देखील ओळखले जाते.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य

Savitribai Phule Information In Marathi


१) १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीरावांनी मुलींची शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हंटले जाते.
२) इ.स. १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या.
३) इ.स. १८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.
४) २८ जानेवारी १८६३ साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. बालहत्या प्रतिबंधगृह जोतीरावांनी सुरु केले असले तरी त्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती.
५) १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.
६) इ.स. १८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले.
७) इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

सावित्रीबाई फुले यांची प्रकाशित पुस्तके


– काव्यफुले (काव्यसंग्रह)
– सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
– सुबोध रत्नाकर
– बावनकशी

सावित्रीबाई फुले यांचे काही काव्य


विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन

सावित्रीबाई जोतीराव फुले
कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई

सावित्रीबाई जोतीराव फुले
रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने

सावित्रीबाई जोतीराव फुले
काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।
सर्वा जागे केले। या सूर्याने ।।
शूद्र या क्षितीजी।
जोतिबा हा सूर्य ।।
तेजस्वी अपूर्व। उगवला।।

सावित्रीबाई जोतीराव फुले

फुले, सावित्रीबाई : (३ जानेवारी १८३१—१० मार्च १८९७). भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवयित्री. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. वडील खंडोजी नेवसे पाटील, आई लक्ष्मीबाई आणि सिंधुजी, सखाराम व श्रीपती या तीन भावंडांसह सावित्रीबाईंचे बालपण आनंदात व्यतीत झाले. त्यांचा विवाह १८४० मध्ये जोतीराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर जोतीरावांनी त्यांना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांनी घेतली. पुढे सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फॅरारबाई आणि पुण्यात मिचेलबाई यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले.

सावित्रीबाई फुले

१ जानेवारी १८४८ रोजी जोतीरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई वयाच्या १७ व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन शिकवू लागल्या. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. सुरुवातीस अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले अशा सहा ब्राह्मण-धनगर-मराठा जातींतील मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला. काही धर्ममार्तंडांनी ‘धर्म बुडाला’ अशी ओरड केली व ते सावित्रीबाईंवर ‘धर्मबुडवी’ म्हणून शेणमाती फेकू लागले. तरीसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत. सर्व विरोधाला धैर्याने तोंड देत त्यांनी आपली आगेकूच चालूच ठेवली.

१८५१ मध्ये फुले दांपत्याने चिपळूणकरांच्या वाड्यातील आणि रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना केली. १० सप्टेंबर १८५३ या दिवशी जोतीरावांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह ‘महार मांग इ. लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळी’ या नावाची संस्था स्थापन केली. या कामात त्यांना मातृवत असणाऱ्या सगुणाबाई क्षीरसागर यांची मोलाची मदत झाली. सावित्रीबाईंसह सगुणाबाई आणि फातिमा शेख याही मुलींच्या शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. शिवाय विष्णुपंत थत्ते व वामनराव खराडकर हे ब्राह्मण मित्रही या शाळेत शिक्षक म्हणून काम करत. जोतीरावांचे एक जिवलग मित्र उस्मान शेख यांच्या फातिमा या भगिनी होत. १८४९ साली जेव्हा फुले दांपत्याला गृहत्याग करावा लागला, तेव्हा त्यांना उस्मान शेख यांनी मदत केली. आपल्या राहत्या घरातील जागा त्यांनी या दांपत्यास राहायला दिली.

सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख त्यांच्या शाळेतील विद्यार्थिनींसह त्यांच्या शाळांमध्ये सर्व जातींच्या मुलामुलींना प्रवेश होता. त्यांच्या एका शाळेतील मातंग समाजातील विद्यार्थिनी मुक्ता साळवे या १४ वर्षीय मुलीने लिहिलेला ‘मांग महारांच्या दु:खाविषयी निबंध’ (फेब्रु.-मार्च, १८५५) हा लेख ‘ज्ञानोदय’ वृत्तपत्रात प्रकाशित झाला. त्यात तिने ‘वेद किंवा धार्मिक पुस्तके वाचण्याचा अधिकार नाही, तर मग आमचा धर्म कोणता?’ असा प्रश्न उपस्थित केला. तसेच जातीनिहाय स्त्रीविषयक भीषण वास्तव कसे वेगळे असते तेही त्यातून मांडले. या निबंधाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने तो मुंबई प्रांताच्या शैक्षणिक अहवालामध्ये छापला. फुले दांपत्याने पुण्यामध्ये १८५६ साली पहिले देशी (नेटिव्ह) ग्रंथालय सुरू केले. फुले दांपत्याच्या विचारांनी प्रभावित झालेल्या ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली ‘स्त्रीपुरुषतुलना’ या ग्रंथातून स्त्रियांची शोचनीय परिस्थिती मांडली. यावरून फुले दांपत्याच्या शाळांद्वारे स्त्रीवर्गात होऊ लागलेल्या जागृतीची कल्पना येऊ शकते. त्यातून आधुनिक महाराष्ट्रातील स्त्रीची जडणघडण होण्यास मदत झाली.

१८६३ साली जोतीराव-सावित्रीबाईंनी गंजपेठेतील राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. १८८४ पर्यंत अनेक भागांतून सु. ३५ असहाय स्त्रिया तेथे आल्या. अशा स्त्रियांची बाळंतपणे सावित्रीबाई स्वतः करीत. त्यांतीलच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा यशवंत नामक मुलगा फुले दांपत्याने दत्तक घेतला. पुढे तो वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्य (डॉक्टर) बनला आणि या दांपत्याचे समाजसेवेचे कार्य त्याने पुढे नेले. या दांपत्याच्या कार्यामुळे प्रेरित होऊन १८७५ साली पंढरपूरला तेथील दुय्यम न्यायाधीश लालशंकर उमियाशंकर यांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली.

फुले दाम्पत्य , स्वातंत्र्य आणि विवेकनिष्ठा या तत्त्वांवर आधारित नवा आधुनिक समाज निर्माण करण्याचे जोतीरावांचे ध्येय होते. त्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. अशा सर्वच कार्यात सावित्रीबाईंची खंबीर साथ त्यांना लाभली. सत्यशोधक जलसे, साहित्य, भाषणे, वृत्तपत्रे अशा विविध माध्यमांतून त्यांनी जनजागृती केली. या चळवळीचे लोण महाराष्ट्रात पसरले. सत्यशोधक विवाहपद्धतीद्वारे त्यांनी ब्राह्मण पुरोहिताशिवाय आणि हुंडा न देता साध्या पद्धतीने विवाह करण्याचा पर्याय समाजाला दिला. सावित्रीबाईंची मैत्रीण बजूबाई ज्ञानोबा निंबणकर यांची कन्या राधा आणि सत्यशोधक कार्यकर्ते सीताराम जवाजी आल्हाट यांचा अशा पद्धतीचा पहिला विवाह सावित्रीबाईंनी स्वखर्चाने घडवून आणला. या विवाहामुळे त्यांना अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले. ४ फेब्रुवारी १८८९ साली त्यांचा पुत्र यशवंत आणि सत्यशोधक समाजाचे नेते ग्यानोबा ससाणे यांची कन्या राधा उर्फ लक्ष्मी यांचा विवाहही याच पद्धतीने संपन्न झाला. हा आंतरजातीय विवाह होता. विधवांचे केशवपन ही त्या काळातील एक दुष्ट प्रथा होती. जोतीरावांचे सहकारी आणि ‘दीनबंधू’चे संपादक नारायण मेघाजी लोखंडे यांनी नाभिकांना एकत्र आणले आणि त्यांना विधवांचे केशवपन न करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देऊन सु. एक हजार नाभिकांनी संप केला. या आंदोलनाला सावित्रीबाईंची प्रेरणा होती. याचा वृत्तांत लंडनच्या ‘दि टाईम्स’ या वृत्तपत्रात ९ एप्रिल १८९० च्या अंकात छापून आला. तसेच इंग्लडमधील सुधारक चळवळीतील स्त्रियांनी त्यांना अभिनंदनाचे पत्रही पाठवले.

२८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीरावांचा मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास यशवंत या त्यांच्या दत्तकपुत्रास नातेवाईकांनी विरोध केला, तेव्हा सावित्रीबाईंनी न डगमगता जोतीरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. हे एक क्रांतिकारक पाऊल होते. जोतीरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती अखेरपर्यंत सांभाळली. १८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

१८७६-७७ आणि १८९६ या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्या वेळी सावित्रीबाईंनी गोरगरिबांना खूप मदत केली. सत्यशोधक समाजाद्वारे ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडून सु. २००० मुलामुलींची भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. १८९७ पासून पुण्यात प्लेगची साथ आली, तेव्हा मृत्यूला न घाबरता सावित्रीबाईंनी प्लेगबाधित रुग्णांची सेवाशुश्रूषा केली; पण अखेर त्यांना प्लेगची बाधा होऊन त्यातच त्यांचे दुर्देवी निधन झाले.

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *