Essay On Mother In Marathi

By vedu Feb 6, 2024
Essay On Mother In Marathi

Essay On Mother In Marathi आज आपण या लेखात पाहणार आहोत दहावी केव्हा दहावी खालील बाकी वर्गाच्या वार्षिक पेपरात येणारे महत्त्वाचे निबंध. आज आपण पाहणार आहोत माझी आई, माझी आजी, आजोबा, माझ्या आवडते शिक्षक हे सर्व निबंध आज आपण छान मराठी भाषेत पाहणार आहोत

माझी आई

रामायणात महर्षी वाल्मीकीनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि।’ खरोखर किती अचूक वर्णन आहे हे! आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य थिटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, “इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे ‘प्रसादपट’ हे थिटे ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही.”

माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच मला मिळाले आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धात मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेल्या मजकुरातील हस्ताक्षर पसंत पडले नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले.

मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या. मी परीक्षेला घाबरायचो, कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला शालाबाह्य अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, ‘न ऋण जन्मदेचे फिटे.’

माझ्या आईने माझ्यासाठी स्वतःच्या ‘करीअर ‘चा कधीच विचार केला नाही. ती स्वतः एम्. एस्सी. असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी. केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून, अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती.

माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे, कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते. खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती कष्ट उपसत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.’

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, ‘एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.’ आजच्या काळातील दहशतवाद, भ्रष्टाचार वगैरे समाजविघातक गोष्टीविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई.” खरेच प्रत्येकाने आपल्या मातेच्या शिकवणुकीचा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थबकतील.

आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, लहानपणापासून आईचा विरह ज्याच्या वाट्याला आला असेल, त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’

माझी आजी

बाबांना ‘ पारखे पारितोषिक’ मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी सासवन्याहून आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, “अरे नंदू, माझी खूप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला.” आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.

आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.

माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या ‘रयत शिक्षण’ संस्थेत काम करत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करत राहिले. सगळा ‘निष्काम कर्मयोग’ ! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही, हे खरंच !

आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटो आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची ‘मोठी आई’ बनली आहे.

आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वत:चे सर्व आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज, पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण, ती एकभुक्त आहे. म्हणजे दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच ओजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते.

आजी स्वतःसाठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते, दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे, त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिलं आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते, आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.

माझे आजोबा

माझे आजोबा म्हणजे सदैव प्रसन्न अशी मूर्ती; ते नेहमी आनंदी असतात. कधी कुरकुर नाही की कधी चिडचिड नाही. मी त्यांना अजूनपर्यंत कधी चिडचिड करताना पाहिलेले नाही. ते सदोदित हास्यविनोद करत वावरतात. यामुळे सगळ्यांना त्यांचा सहवास आवडतो. त्यांच्या स्नेहह्यांचा मोठा गोतावळा आहे. आमच्या सर्व नातेवाईकांनाही आजोबा खूप आवडतात. आजोबा सर्वांची नेहमी अगत्याने चौकशी करतात. सगळ्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. त्यामुळे आमच्याकडे पाहुण्यांची व मित्रमंडळींची सतत वर्दळ असते. आजोबा दिसले की, सगळ्यांना आनंद होतो.

माझ्या आजोबांना नीटनेटकेपणा व स्वच्छता यांची भारी आवड आहे. हा गुण तर सगळ्यांनी त्यांच्याकडून घ्यावा असा आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळी नीटनेटकेपणाने होते. प्रथम खिडक्या, कठडे, खुच्र्या-टेबले, कपाट यांच्यावरची धूळ ते पुसून काढतात. सुमारे अर्धा तास त्यांची ही साफसफाई चालते. मग ते त्यांनी आवडीने लावलेल्या रोपट्यांकडे वळतात. इथेही त्यांच्या स्वभावातील नीटनेटकेपणा व प्रेमळपणा दिसून येतो. प्रथम ते मऊ व ओलसर फडक्याने रोपट्याची पाने हळुवारपणे पुसून घेताना; ओल्या फडक्याने कुंडी पुसून घेतात आणि मग रोपट्यांना पाणी घालतात. आजोबांच्या प्रेमळ स्पशनि जणू रोपटी टवटवीत बनतात.

साफसफाई झाली की, ते आंघोळ करतात; न्याहरी घेतात आणि सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडतात. तासाभराने परत आले की, पुन्हा एकदा चहा घेतल्यावर त्यांच्या आवडीच्या दिनक्रमाला सुरुवात करतात, तो म्हणजे वाचनाचा, ते तासभर तरी वर्तमानपत्रे वाचतात. त्यांना वर्तमानपत्रे वाचायला खूप आवडतात. म्हणून आम्ही तीन वर्तमानपत्रे घेतो. एक इंग्रजी आणि दोन मराठी. ते वाचत असताना आजूबाजूला कोणी असले, तर त्यांना ते वर्तमानपत्रातील महत्वाच्या बातम्या ऐकवतात. इंग्रजी वर्तमानपत्र वाचताना ते ने चुकता शब्दकोश घेऊन बसतात. एखादा शब्द अडला, तर कंटाळा न करता शब्दकोशात शब्द शोधतात. मी बाजूला असलो, तर त्यांना मदत हवी असल्याचा आव आणून मला शब्द शोधायला लावतात. त्यांच्या या सवयीचा मला इतका फायदा झाला आहे की, वर्गात माझा इंग्रजी निबंध सगळ्यांपेक्षा चांगला असतो.

संध्याकाळी फेरफटका आटोपल्यावर ते माझ्याशी गप्पा मारायला बसतात. माझी दिवसभराची सगळी हकिकत विचारून घेतात. शाळेत कोणकोणत्या विषयांचे तास झाले, कौणी काही प्रश्न विचारले का, शिकवलेल्या भागातील काय जास्त आवडले, काय कठीण बाटले – असे सर्व काही विचारून घेतात. आता माझ्या लक्षात येते की, त्यांच्या या सवयीमुळे त्या त्या दिवशी शिकवलेल्या अभ्यासाची नकळत उजळणी होऊन गेली आहे. मी अभ्यासाला बसलो की, त्यांचे माझ्याकडे बारीक लक्ष असते. मी कसा बसतो, पेन कसे धरतो, पुस्तक कसे धरतो, वही कशी ठेवतो या गोष्टी ते बारकाईने न्याहाळतात. मला पाठांतर करताना खूप मदत करतात, ते दररोज, अगदी आता दहावीच्या वर्षीही पाठ्यपुस्तकातील थोडा तरी मजकूर मला मोठ्याने वाचायला लावतात. मात्र हे सर्व काही कधीही न रागावता ! सगळ्या बाबतीत पद्धतशीरपणा व नीटनेटकेपणा असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असतो. त्यांची ही सवय हळूहळू माझ्याही अंगी बाणली आहे. मी माझ्या वहह्यांतील सर्व लेखन मन लावून चांगले करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या बाई माझ्या लेखनाची नेहमी स्तुती करतात. मी याचे सर्व श्रेय माझ्या आजोबांना देतो.

मनात चांगले विचार बाळगावेत, त्यानुसार चांगले वागावे आणि हे सर्व नियमितपणे करावे, असे त्यांचे सर्वांना सांगणे असते. माझे आजोबा स्वतः तसेच वागतात. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले’, असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. ज्यांची पावले वंदावीत असेच माझे आजोबा आहेत.

माझे आवडते शिक्षक Essay In Marathi on Teacher

आवडते शिक्षक म्हणताच मला आठवतात ते आमचे जाधव सर. जाधव सर हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ आवडतेच नव्हेत; तर प्रातः स्मरणीय आणि वंदनीय आहेत.

केवळ माझेच नव्हे; तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विदद्यार्थी शिकून त्या सवदि आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर ! किंबहुना या शाळेतील विद्यार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटले की, ते जाधव सरांच्या हटकून आठवणी काढतात.

जाधव सरांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आहे. उंच शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण आफि प्रसन्त चेहरा. सरांचा पोशाख अगदी साधा, पण स्वच्छ, कधी कधी ते खादीचा लांब सदर घालतात; तेव्हा तर ते एकदम रुवाबदार दिसतात. त्यांनी कधी भडक रंगाचे कपडे घातलेले मला आठवतच नाही. सिनेमातल्या ढंगाचे फॅशनेबल कपडे त्यांच्या अंगावर कधी दिसले नाहीत. या स्वच्छ व साध्या पोशाखावरूनही पाहणाऱ्याला सरांच्या स्वच्छ व निर्मल अंत:करणाची आणि निष्कलंक चारित्र्याची लगेच पटावी.

जाधव सर आम्हांला विज्ञान व गणित विषय शिकवतात. या विषयांत त्यांचा हातखंडाच होता. विज्ञान विषय कठीण व कंटाळवाणा आणि गणित तर भीतिदायक ! पण जाधव सरांचे कौशल्य असे की, हे विषय आम्हांला कधी कंटाळवाणे वाटले नाहीत वा त्यांची भीतीही वाटली नाही.

घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेत घेत ते सहज अभ्यासाकडे वळत. एकदा विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते ‘दही लावण्या ‘चे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलईसारखे होण्यासाठी कसे लावतात, हे सांगता सांगता बॅक्टेरिया म्हणजे काय, त्यांचे स्वरूप कसे असते, त्यांचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातील माहितीकडे ते केव्हा वळले, कळलेच नाही. एकदा घरातील फ्युज गेल्यावर त्यांना वितळतार मिळेना, तेव्हा वायरमधील साधी तार लावून वीजप्रवाह कसा सुरू केला, हे त्यांनी आम्हांला वर्गात सांगितले. त्यानंतर लागलीच धावतपळत जाऊन वितळतार आणली आणि साध्या तारेच्या जागी ती बसवली. हे आपण का केले, नाही तर कोणता धोका होता, हे समजावून सांगता सांगता त्यांनी विजेचे वहन, त्याचे परिणाम इत्यादी बाबी अलगद आमच्या डोक्यात घातल्या. अनेकदा ते शास्त्रज्ञांच्या आयुष्यातले धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यायोगे अनेक सिद्धांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत. जाधव सर गणितातील अनेक प्रमेये शिकवताना गणितज्ञांच्या रंजक आठवणी सांगत. त्यामुळे प्रमेये आम्हांला कधी किचकट वाटलीच नाहीत.

विज्ञानप्रदर्शन हा तर जाधव सरांचा जिव्हयाळ्याचा विषय. आम्हा विद्यार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनात भाग घ्यायला लावत. आम्हांला ते विषय नेमून देत. आम्हांला विचार करायला लावत; उपक्रम शोधायला लावत. या प्रयत्नांत त्यांचे मार्गदर्शनही असे. त्यामुळे आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांच्या ऐटीत विज्ञानातील उपक्रम सादर करत असू.

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *