Marathi Essay For School | शालेय मराठी निबंध

By vedu Feb 2, 2024
Marathi Essay For School शालेय मराठी निबंध

Marathi Essay For School वर्णनात्मक निबंधासाठी तुम्हांला जे विषय दिले जातात ते बहुधा

तुमच्या परिचयातलेच असतात. म्हणून आपल्या अवतीभवती जे घडत असते, त्याचे आपण नीट निरीक्षण केले पाहिजे. त्यांतील महत्त्वाच्या गोष्टी आपल्या वहीत टिपून ठेवाव्यात. काही वेळेला एखादया दृश्याचे, प्रसंगाचे अतिशय उत्कृष्ट वर्णन केलेले आपल्या वाचनात येते. तेही आपल्या वहीत टिपून ठेवावे. आपण छान छान कविता वाचतो. शक्यतो या कविता तोंडपाठ कराव्यात, म्हणजे वर्णनात्मक निबंधात आपल्याला त्यांचा उपयोग करता येतो.

वर्णन करताना आपल्याला त्या संबंधात एखादा मौलिक (नाविन्यपूर्ण) विचार सुचला, तर त्याचा उल्लेख करून निबंधाचा समारोप करावा. निबंधाची भाषा साधी, सोपी, ओघवती आणि आकर्षक असावी. तसेच निबंधाची मांडणी मुद्देसूद असावी.

माझा महाराष्ट्र Essay On Majha Maharashtra

आमच्या शाळेत ‘एक मे’ चा महाराष्ट्र दिनाचा समारंभ चालू होता. व्यासपीठावर मुले महाराष्ट्र-गीत गात होती. ते ऐकताना माझ्या मनात आले की, खरोखरच आमचा हा महान आहे. मराठी माणसाच्या महान प्रयत्नानंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य साकार झाले.

महाराष्ट्र हा डोंगराळ प्रदेश असला तरी आज तेथील माणसांनी अविरत प्रयत्नांनी महाराष्ट्राला सुपीक बनवले आहे. ऊस पिकवून साखर कारखाने काढले. फळाफुलांच्या बागा बहरल्या, महाराष्ट्रातल्या हापूस आंब्याने सारे जग जिंकले. आता तर महाराष्ट्राचा मोगरा पौर्वात्य देशांना सुगंधित करत आहे.

माझ्या महाराष्ट्राला दैदिप्यमान इतिहास आहे. शिवरायाच्या पराक्रमाची आठवण देणारे अनेक गडकिल्ले आजही महाराष्ट्रात ताठ मानेने उभे आहेत. त्याचबरोबर शिल्पकारांच्या बोटातील जादू दाखवणारी अजिंठा, वेरूळची लेणी जगन्मान्यता पावली आहेत. गोदा, भिमा, चंद्रभागा इत्यादी नदयांच्या काठची तीर्थक्षेत्रे आजही भागवत धर्माच्या पताकेखाली सर्व वारकऱ्यांना एकत्र आणतात.

महाराष्ट्र हो नररलांची खाण आहे. महाराष्ट्राने लोकमान्य टिळक दिले. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे हे सर्व समाजसुधारक या मराठी मातीतीलच आहेत. असे एकही कार्यक्षेत्र आढळणार नाही की, जेथे मराठी माणसाने अप्रतिम कारागिरी केली नाही. आजच्या वैज्ञानिक, औद‌योगिक युगातही महाराष्ट्राची पताका सर्वत्र आघाडीवर आहे.

महाराष्ट्राचे मोठे वैभव म्हणजे ‘मराठी बाणा.’ जगाच्या पाठीवर मराठी माणूस कोठेही असला तरी तो आपला मराठी बाणा सोडत नाही. ‘मोडेन पण वाकणार नाही’ ही त्याची वृत्ती असल्याने त्याची सदैव घोडदौड असते ती विजयाकडेच.

बागेतील सहल Bagetli Trip Essay

आमच्या शाळेजवळ असलेल्या एका उदद्यानाचे नुकतेच उद्घाटन झाले होते. त्यामुळे त्या उद्यानास भेट देण्यास आम्ही आतुर होतो. ती संधी लवकरच आम्हांला मिळाली. कारण आमच्या सरांनी यंदाचा ‘ बालदिन’ या उद्यानात साजरा करण्याचे ठरवले.

चौदा नोव्हेंबरच्या सकाळी सर्वजण अगदी वेळेवर शाळेत उपस्थित झाले आणि मग आमची विद्यार्थिसेना उदयानाकडे निघाली. आकाश निरभ्र होते, हळूहळू दिवस वर येत होता. सुखद गारवा शरीराला रोमांचित करत होता. त्यामुळे उद्यानाच्या दाराशी केव्हा येऊन पोचलो ते कळलेच नाही.

‘ज्ञानेश्वर प्रसन्न चेहऱ्याने स्वागतासाठी उभे ठाकले होते. उदयानतज्ज्ञांनी मोठ्या मेहनतीने हे उदयान तयार केले होते. पाच वर्तुळे एकमेकांस स्पर्श करून फुलली होती. शिवाय एक सहावे भले वर्तुळ आपल्या वेगळेपणाने खुलून दिसत होते.

बागेत प्रवेश केल्यावर सर्व विद्यार्थ्यांची शाळेतली शिस्त गळून पडली, सर्वजण बागेत (बागडू लागले. तेव्हा गुरुजींनी सर्वांना एकत्र करून उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी लावलेल्या सूचना वाचायला सांगितल्या.

उद्यानातील या पाच विभागांची आपापली वैशिष्ट्ये होती. पहिल्या रोजा’ विभागात विविध रंगांचे गुलाब होते. त्यांतील काळ्या व निळ्या गुलाबांनी लक्ष वेधून घेतले. काट्यांविना फुललेला गुलाब पाहून तर तोंडात बोटे घालायची वेळ आली. दुसऱ्या विभागात तर रंगांची नुस्ती उधळणच होती. रंगीबेरींगी तेरडे, शेवंती, जास्वंदी यांनी एक नेत्राकर्षक रांगोळीच रेखली होती. तिसऱ्या विभागाचे नाव होते ‘वल्लिका कुंज’ साधी बोगनवेलही आपल्या रंगीबेरंगी रिबिनींनी किती आनंद देऊ शकते याचे जणु प्रात्यक्षिकच देत होती. चौथ्या वाटिकेत माळ्यांची कात्रीची करामत दिसत होती, तर पाचव्या विभागात आकाशाला भिडू पाहणाऱ्या झाडांची दाटी झाली होती.

उदयान पाहून डोळे तृप्त झाले होते. आता पोटात कावळे ओरडू लागले, जरा बाजूला असलेल्या सहाव्या विभागाकडे वळली. तेथे भोजन करण्यासाठी मोकळी जागा होती. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय होती. आम्ही बरोबर आणलेल्या शिदोरीवर ताव मारला आणि मग असलेल्या विभागाकडे धूम ठोकली. खेळता खेळता संध्याकाळ झाली आणि आम्ही रमतगमत घरी परतलो.

एक रम्य पहाट किंवा मी पाहिलेला एक रम्य देखावा
Morning Essay In Marathi

शाळेला सुट्टी लागली होती. खरं म्हणजे भरपूर झोपायला हरकत नव्हती. पण सुट्टीच्या दिवसांतच नको तेव्हा लवकर जाग येते. प्रयत्न करूनही झोप येईना, तेव्हा उठून बाहेर आलो. आजोबा प्रभातकालीन फेरीला बाहेर पडत होते. त्यांना म्हणालो, ” दादा थांबा, मी पण येतो आज तुमच्याबरोबर.”

नुकतीच सूर्योदयाची चाहूल लागत होती पण अजून सूर्यदेव रुजू झाले नव्हते. अस्पष्ट प्रकाशात सर्वच वस्तू अस्पष्ट दिसत होत्या. झाडे नुकतीच जागी होऊ लागली होती. झाडांवरचे पक्षी किलबिल करत होते. जणू दिवसाच्या कामगिरीवर निघण्यापूर्वी त्यांची पुढील बेतांची आखणी चालू असावी. आपल्यामागे घरट्यात राहणाऱ्या पिल्लांना त्यांच्या माता प्रेमाने सूचना देत असाव्यात, असे वाटत होते.

थोड्याच वेळात फटफटले. पूर्व दिशेला कुणीतरी लाल रंग उधळला. आजोबांचे विसाव्याचे स्थान आले. त्यांचे काही समवयस्क मित्र तेथे बसले होते. आजोबा तेथेच आणि बागेत फेरफटका मारण्यासाठी मी पुढे निघालो.झाडांवरच्या कळ्या टपोऱ्या दिसत होत्या. त्यांना उमलण्याची घाई झाली असावी. पानांवरचे दवबिंदू चमकत होते. फुलपाखरे मध गोळा करण्याच्या कामाला लागली होती. बागेतील काही माणसे गप्पांत रंगली होती. तर काहीजण व्यायाम करत होती. एक चित्रकार ते सुंदर दृश्य कागदावर रेखाटत होता. ते पाहून मी तेथेच काही वेळ उभा राहिलो.

पूर्व दिशा आता अधिकच उजळली होती. डोंगराआडून एक तेजस्वी प्रकाशाचा झोत बाहेर येऊ लागला. मी टक लावून पाहत होतो. पाहतापाहता सहस्ररश्मी वरें सरकू लागला. एक लाल रंगाचा गोळा. आकाशात वर आल्यावर त्याचा आकार लहान झाला व हळूहळू त्याचे तेज लागले. आता त्याच्याकडे पाहणे अशक्य झाले. आजोबांनी मला हाक मारली आणि मी परत फिरलो.

भारत देश महान Bharat Desh Mahan Essay In Marathi

घंटा घणघणली. आम्ही सारे विदयार्थी शाळेच्या पटांगणात जमून अभिमानाने प्रतिज्ञा घेत होतो. “भारत माझा देश आहे. मी भारतीय आहे.” प्रतिज्ञा संपल्यावर आमचे मुख्याध्यापक म्हणाले, “फार मोठी सांस्कृतिक परंपरा आपल्यामागे उभी आहे आणि या परंपरेत बसणारे कर्तृत्व आपल्या प्रत्येकाच्या हातून व्हायला पाहिजे.”

भारत हा प्राचीन देश आहे. भारताला प्राचीन वैभवशाली इतिहास आहे. एकेकाळी भारत देश सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. जगातील विद्वान भारतातील तक्षशिला, नालंदा या विदद्यापीठांत ज्ञान घेण्यासाठी येत असत. तसे उल्लेख चिनी प्रवाशांनी केले आहेत.

विदयांप्रमाणे विविध कलांमध्येही माझ्या भारताची मोठी कामगिरी होती. त्यांचे पुरावे आजही उपलब्ध आहेत.

भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे. तसाच तो संतांचाही देश आहे. विविध धर्मसंस्थापकांनी भारताला सदैव सुविचारांनी सजवले. मधली दीडशे वर्षे भारताला गुलामगिरी सहन करावी लागली; पण त्या काळातही निःशस्त्र भारतीयांनी सशस्त्र सत्तेशी लढा दिला. अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मागनि भारताने आपले स्वातंत्र मिळवले.

आजही माझा भारत सतत प्रगती करत आहे. या विशाल देशापुढे सदैव अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या उभ्या राहतात; पण भारतीय मोठ्या जिद्दीने त्यावर मात करतात. विविध जाती, विविध धर्म व विविध भाषा ही भारताची वैशिष्ट्ये आहेत. तरीपण सहिष्णुतेने सारे भारतीय एकत्र राहतात. क्वचित काही समाजविघातक शक्ती भारतीयांचे हे ऐक्य व बंधुभाव नष्ट करण्याचा यत्न करतात; पण या. देशाचे ऐक्य अबाधित राहिले आहे.

मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे. हरितक्रांतीच्या मार्गाने जाऊन भारत अन्नधान्याच्याबाबतीत स्वावलंबी झाला. श्वेतक्रांती झाल्यामुळे दह्यादुधाची लयलूट झाली. आज औदयोगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रांतही भारत प्रगती करत आहे. म्हणूनच माझा भारत देश महान आहे.

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *