Short Essay In Marathi

By vedu Feb 3, 2024
short marathi essay

शाळेसाठी किंवा मराठी निबंध गृहपाठ देण्यासाठी दिला असेल तर खालील निबंध तुम्हाला उपयुक्त ठरतील आज आपण या आर्टिकल मध्ये मैत्रीविषयी आईविषयी वाचनाचे फायदे आणि संस्काराचे महत्त्व हे सर्व निबंध पाहणार आहोत.

Short Essay In Marathi l Marathi Nibandh

मैत्री

जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचे मोल कधी करता येत नाही. त्यांपैकी एक म्हणजे ‘मैत्री’. मैत्री हा अनमोल ठेवा आहे. म्हणून प्राचीन काळापासून अशा मैत्रीला नावाजले जाते. ज्याला खरा मित्र लाभला आहे तो खऱ्या अर्थान धनवान असतो. नाहीतर कोट्यवधी रुपये आहेत; पण मनीचे सुखदुःख उघड करायला कोणीही मित्र नाही, तो राव

असूनही रंकच ठरतो. मैत्री ही ठरवून होत नसते. ‘चल तू आणि मी मित्र होऊ’ असे म्हणून, ठरवून मित्र बनत नसतो. म्हणून तर प्रत्येक सहाध्यायीं, सहव्यवसायी हा मित्र असू शकत नाही. सहवासाने परिचय होईल, ओळख होईल, पण मनाच्या तारा जुळतीलच असे नाही.

प्रसिद्ध लघुनिबंधकार ना. सी. फडके सांगतात की, मैत्री ही स्फुल्लिगासारखी आहे. ती केव्हा प्रकट होईल सांगता येणार नाही. एखादया क्षणी जुळलेली ही मने वर्षानुवर्षे – जुळलेली राहतात. संस्कृत सुभाषितकार सांगतो, ‘व्यसने मित्रपरीक्षा ।’ संकटातच मित्राची परीक्षा होते. खरा मित्र कसा ओळखावा? साधारणतः जगरहाटी अशी असते की, असतील शिते तर जमतील भुते. जोवर आपल्याजवळ भरपूर काही आहे, तोवर मैत्रीचा, प्रेमाचा देखावा करणारी मंडळी आपल्या भोवताली जमतात. ते आपली खुशामत करतात. पण आपल्या पडत्या काळात ही जमलेली पाखरे भुर्रकन उडून जातात.

खरा मित्र कधीच खुशामत करत नाही. उलट आपण चुकत असलो तर कठोर शब्दांच्या फटकाऱ्याने तो आपल्याला जागे करतो. आपल्या विजयाने, यशाने तो आनंदी होतो आणि मनापासून तो आपले अभिनंदन करतो, गौरवतो. अडचणीच्या काळात काहीही न सांगता तो मदतीला धावून येतो. त्याबाबत तो परतफेडीची करत नाही. ना. सी. फडके सांगतात की, आमचे चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल जो सावरतो तोच खरा मित्र होय. असा मित्र लाभणे आणि त्यापासून मैत्रीचे वैभव लाभणे, यापेक्षा परमभाग्य कोणते? इंग्रजी भाषेत एक म्हण आहे: ‘Friend in need is friend indeed.’

आईचे प्रेम

कवी यशवंत म्हणतात- ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ बाकी सर्व गोष्टी माणूस पैशाने विकत घेऊ शकतो, सत्तेने बळकावू शकतो; पण त्याला मिळत नाही ती एकच गोष्ट म्हणजे ‘आईचे प्रेम’. म्हणून तर कवी माधव ज्युलियन यांच्या कवितेतील पोरका तरुण म्हणतो-

विदयाधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही आईविणे परी मी हा पोरकाच राही.

आईचे प्रेम आपल्याला जन्मतः प्राप्त झालेले असते, म्हणून आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. बाळाची चाहूल लागल्यापासून आई त्याची काळजी घेऊ लागते. आपल्या बाळाची भूक, झोप, त्याच्या साऱ्या सवयी तिला ज्ञात असतात. म्हणूनच बाळाकडे येण्यासाठी हिरकणी गवळण अवघड कडा उतरून आली.

आईचे हे प्रेम केवळ मानवातच आढळते असे नाही तर पशू, पक्षी, सारे प्राणी यांतील माता एकाच भावनेने ओथंबलेल्या असतात. घार उंच आकाशात उडत असते; पण तिचे चित्त आपल्या बाळांपाशी असते. पाण्यात कासवी आपल्या बाळांपासून दूर असते, पण आपल्या दृष्टीने ती आपल्या बाळांवर प्रेम करते, त्यांना मोठे करते. कोंबडी दाणे टिपत असते, पण काही धोका आहे, असे वाटले तर धावत जाऊन आपल्या पिल्लांना पंखांखाली घेते. आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी मांजरी त्यांच्या जागा दहा वेळा बदलते. घरातील पाळलेली कुत्री रोज सर्वांच्या अंगावर उड्या मारणारी, पण तिची पिल्ले लहान असताना ती कोणाला जवळ फिरकूही देत नाही. स्वतःच्या पिल्लांना धोका आहे, असं वाटलं तर सर्पण आपली पिल्ले गिळते आणि धोका टळला अशी खात्री झाली की, ती पिल्ले आपल्या तोंडातून बाहेर सोडते.

असे हे मातृप्रेम, कवींनी त्याचे वर्णन ‘वात्सल्य’ या शब्दात केले. पण प्रसंगी ती माता एखादया सौदामिनीसारखी संतप्त होते. आपल्या अपत्याला ती कठोरातील कठोर शिक्षा, देते. पण तीही कशासाठी? तर त्याच्याच हितासाठी ना! जेव्हा माता आपल्या बाळाला शिक्षा करते तेव्हा ती अप्रत्यक्षपणे स्वतःलाही शिक्षा करत असते. बाळाला उपाशी ठेवलं,

तर मातेच्याही घशाखाली घास उतरत नाही.

मातेचे हे प्रेम कधी आटत नाही. ते परतफेडीची अपेक्षा करत नाही. भेदभाव बाळगत नाही. उलट चार मुलांत एखादे मूल अपंग, दुर्बळे असले तर आईला त्याची विशेष काळजी वाटते. म्हणूनच तर मतिमंद मुलाचे आपल्या मागे कसे होईल, या विचाराने त्याची माता अस्वस्थ होते. कवी मोरोपंतांनी मातेच्या प्रेमाची ही महती जाणली होती, म्हणूनच ते

प्रसादपट झाकिती परी परा गुरूचे थिटे
म्हणून म्हणति भले न ऋण जन्मदेने फिटे ।।

परमप्रिय गोष्टीची बरोबरी माणूस आईशी करतो. शेतकरी आपल्या जमिनीला ‘कळी आई’ म्हणतो, तर वारकरी विठ्ठलाला’ विठाई माऊली’ म्हणून साद घालतो आणि ज्ञानेश्वरांसारख्या बालयोग्यात त्याला ज्ञानेश्वर माऊली’ दिसते.

वाचनाचे फायदे

स्नेहसंमेलनाच्या वेळी शाळेने एक आगळी स्पर्धा आयोजित केली होती ‘सामान्यज्ञान स्पर्धा’, मुलांना अभ्यासेतर, अवांतर भाहिती किती आहे, याची शाळेला चाचणी करायची होती. या स्पर्धेत संपूर्ण शाळेत निरुपमा पहिलो आली. निरुपमाला या यशाचे गमक विचारले तेव्हा ती म्हणाली, “माझे वाचन प्रेम.”

वाचनाची सवय ही माणसाला फार बालपणापासून लागायला हवी. कुणाला अतिशयोक्ती वाटेल, पण जेव्हा मुलाला वाचायला येत नसते तेव्हापासूनच त्याला वाचनाची गोडी लागायला हवी. तेव्हा तो वाचू शकणार नाही, पण कुणीतरी वाचलेले तो ऐकू शकतो. असे ऐकण्याची गोडी लागलेले बाळ स्वतः पुस्तक वाचायला अतिशय उत्सुक असते.

मोठेपणी केलेल्या वाचनाने विद्वत्ता येत असेल तर लहानपणी केलेले वाचन बालवाचकाच्या मनावर चांगले संस्कार करून जाते. ‘श्यामची आई ‘मधील आई श्यामवर जेव्हा एकेक संस्कार करते, तेव्हा ‘श्यामची आई’ वाचणाऱ्या छोट्यावरही ते संस्कार होत असतात.

मोठ्यांची चरित्रे वाचल्यावर आपल्यापुढे चांगले आदर्श निर्माण होतात. टिळकांची कर्तव्यनिष्ठा, सावरकरांची देशनिष्ठा, तर सेनापती बापटांच्या विद्वत्तेतील साधेपणा अशा चरित्रवाचनांतून वाचकांचे चरित्र घडवले जाते. शिवाजी, तानाजी, नेताजी यांच्या पराक्रमकथा, सुभाषबाबूंचे अचाट साहस बालमनातील उसळत्या वीरवृत्तीला सुखावत राहते.

वाचनाने माणूस बहुश्रुत होतो. मुद्रणकलेच्या शोधामुळे वाचनासाठी भरपूर साहित्य उपलब्ध होते. साधे वृत्तपत्रही आपल्याला कितीतरी गोष्टी सांगून जाते, ज्ञान आणि मनोरंजन हया दोन्ही गोष्टी वाचनाने साधतात, वाचनाच्या छंदातून आपल्याला साया विश्वाची ओळख होऊ शकते.

वाचनाचा छंद असलेले लहान मूल उगाचच नाठाळपणात वेळ घालवत नाही. ते आपल्या रिकाम्या वेळाचा चांगला उपयोग करते. त्याचप्रमाणे वाचनाची आवड असलेले वृ‌द्धही म्हातारपणात कुणालाही पीडादायक ठरत नाहीत.

वर्वाचनाचा छंद उत्तम वक्तृत्वाला पूरक ठरतो. वक्ता आपल्या भाषणात जेव्हा विविध उदाहरणे देतो, तेव्हाच तो श्रोत्याचे मन जिंकून घेतो. त्यासाठी त्याचे वाचन हे बहुविध प्रकारचे व अदयावत हवे. पुष्कळ वाचन करणारा विद्यार्थी विद्याथी-मंडळातले प्रिय असतो, सहलीत, मोकळ्या तासाला त्याचे कथाकथन रंगत आणते.

वाचता वाचता हा वाचक काही वेळेला नकळत उत्तम लेखनही करू लागतो. म्हणजे वाचनाच्या छंदातून उत्तम लेखक घडण्याची शक्यता असते..

संस्कारांचे महत्त्व

आजीकडे तिची कोणी मैत्रीण आली होती. तिच्याबरोबर तिची एक छोटीशी नात होती, माझ्याहूनही लहान होती. तिच्या आजीने आमच्या घरातील सर्वांशी तिची ओळख करून दिली आणि तिने चटकन सर्व वडील मंडळींना वाकून नमस्कार केला. मला तिचे कौतुक बाटले. आम्ही मोठी मुले जसे वागत होतो, ते तिने चिमुरड्या वयात केले होते. तिने मलाही वाकून नमस्कार केल्याचे, मी मोठ्या कौतुकाने आजीला सांगितले. तेव्हा आजी म्हणाली, ” अग, हे संस्कार आहेत त्यांच्या घरचे. पण हे काही कुणी सांगूनसवरून वा शिकवून येत नाहीत, तर घरातील वडील माणसे वागतात त्याचे लहान मुले अनुकरण करतात.” पण आजी पुढे असेही म्हणाली की, नमस्कार हे केवळ बाहय आचरण झाले. मोठ्यांना नमस्कार करण्याबरोबर मोठ्यांविषयी मनात आदरही हवा.

संस्कार हे बालवयात घडत असतात, कारण त्यावेळी मन हे संस्कारक्षम असते. कोणत्याही प्रकारे विचार पक्के झालेले नसतात. अशा वेळी जे चांगले-वाईट दिसते त्याचे अनुकरण सहज होते.

लहान मुलांसमोर घरातील मोठी माणसे एकमेकांशी भांडत असतील, वाईट शब्द वापरत असतील तर ती मुलेही चटकन ते शब्द उच्चारतात. पूर्वी असं सांगत की, एका विद्वानाकडील पोपट संस्कृत भाषेत स्वागत करायचा, तर एका वाईट माणसाच्या घरातला पोपट सर्वांचे अपशब्दांनी स्वागत करत असे.

ज्या कुटुंबात आपण वाढत असतो त्या कुटुंबाचे संस्कार आपल्यात रुजतात. कोणतीही कृती करताना दुसऱ्यांचा विचार आधी करावा ही शिकवण एकदा मनावर ठसली की अशा माणसाकडून सहसा वाईट कृती होत नाही. मग आपल्या घरातील रेडिओ लावताना आपण शेजाऱ्याचा आधी विचार करतो. हीच शिकवण पुढील जीवनात उपयोगी पडते. सार्वजनिक गोष्टी वा स्थळांचा वापर करताना आपण आधी दुसऱ्याचा विचार करतो. सार्वजनिक उद्यानातील झोपाळा अडवून बसताना मुलाने हा विचार केला पाहिजे की, ही बाग सर्वांची आहे.

कोणतीही गोष्ट उद्धटपणाने वा अरेरावीने करण्यापेक्षा विनयाने नम्रतेने केली की, ती आपल्याला आणि त्याबरोबर दुसऱ्यालाही सुखाची ठरते, हे जाणणारा माणूस सर्वांना हवाहवासा वाटतो. आपण सदैव दुसऱ्याला मदत करण्यास तयार असतो, पण त्याचबरोबर दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांबद्दल वा मदतीबद्दल त्याचे आभार मानण्यास कधीही विसरू नये. दुसऱ्यांच्या गुणांचा गौरव करण्याचा मोठेपणा आपल्याजवळ असावा. असे एक ना अनेक संस्कार बालवयात आपल्यावर केले जातात आणि या सुसंस्कारांमुळे आपले जीवन समृद्ध होते.

By vedu

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *